web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे शहरात कोसळधार;दोन दिवसांपासून पावसाच्या सरीवर सरी


 

BY : YML NEWS ठाणे

मान्सून दाखल झाल्याची केवळ वर्दी देऊन संपूर्ण जून महिना दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार कोसळधार सुरू करून ठाणे शहरामध्ये चांगलीच दाणादाण उडवली. शहरातील सखल भागांमध्ये पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली होती. तर, दुसरीकडे वृक्षांची पडझड, संरक्षण भिंती कोसळण्यासारख्या घटना सुरू होत्या. ठाणे महापालिका मुख्यालय परिसरात साचलेल्या पावसामुळे ठाण्याच्या नालेसफाईचा बोजवारा उडाला होता. महापालिकेकडून २७ ते २८ ठिकाणी पंपांची उभारणी करण्यात आली असली तरी त्यानंतरही अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने ठाण्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याच्या दाव्यांमधील फोलपणा उघड झाला होता. ठाणे शहरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी तुंबून राहू नये, यासाठी शहरातील नाल्यांची सफाई १०० टक्के पूर्ण करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. तसेच, शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्यास तो काढून टाकण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या भागात पंप बसवण्यात आले होते. त्यामुळे ठाणे शहरामध्ये पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी होण्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात होता. जून महिन्यातील बराचसे दिवस पावसाने दडी मारल्याने त्याचे परिणाम दिसून आले नव्हते. परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये शहरामध्ये सरासरी ३५ मिमी. पावसाची नोंद झाली. शुक्रवार सायंकाळपर्यंत शहरामध्ये एकूण ३६१ मिमी. पावसाची नोंद झाली. गुरुवारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील परिसर पाण्याखाली गेला होता. तर वंदना, नौपाड्यातील सखल भागांतही पाणी साचल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. पहिल्या दिवशी शहरात झाडे पडण्याच्या सहा, फांद्या पडण्याच्या सहा, धोकादायक झाडांच्या तीन, गॅलरी कोसळण्याची एक, पाणी साचण्याच्या दोन तक्रारी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आल्या होत्या. तर, शुक्रवार सकाळपासून पाचपाखाडी, मुंब्रा, शिळफाटा, घोडबंदर रोड, कासारवडवली, वागळे इस्टेट या भागांमध्ये फांदी कोसळणे, झाड पडणे, संरक्षण भिंत कोसळल्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.

No comments