web-ads-yml-728x90

Breaking News

महिलेवर खूनाचा गुन्हा दाखल महागाई, कौटुंबिक कलह की क्षणभराचा राग;सहा मुलांना विहिरीत ढकलण्याच्या घटनेत अनेक प्रश्न उपस्थित


BY : YML NEWS -  महाड 

महाड तालुक्यातील बिरवाडी जवळील खरवली गावाच्या हद्दीत एका महिलेने आपल्या पोटच्या सहा लहान मुलांना विहिरीत ढकलून दिले. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. या घटनेने प्रत्येकाने हळहळ व्यक्त केली. मात्र या महिलेने हे टोकाचे पाउल का उचलले याचे कारण अद्याप मिळालेले नसले तरी परिसरात सुरु असलेल्या प्राथमिक चर्चेतून महागाई, कौटुंबिक कलह, क्षणाचा राग कि संशयाचे भूत अशी विविध कारणे बोलली जात आहेत. सद्याच्या मोबाईल दुनियेत अडकलेली तरुण पिढी, वाढती महागाई आणि त्यातून निर्माण झालेली व्यसनाधीनता यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याची वेळ आली आहे.

महाड मधील खरवली गावात घडलेल्या या घटनेने सारा रायगड जिल्हा हादरून गेला. या घटनेत सहा बालकांचा नाहक जीव गेला. मंगळवारी पोलिसांनी तपासासाठी अनेकांच्या जबान्या नोंदविण्याचे काम सुरु केले आहे. या घटनेत नाहक जीव गेलेल्या रेशमा, करिश्मा, रोशनी, विद्या, राधा व शिवराज या सहाही बालकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत जिल्ह्यातील तपास यंत्रणा कामाला लागली आहे. आज सकाळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली. मुळचे उत्तर प्रदेशचे रहिवाशी असलेले हे कुटुंब महाड औद्योगिक परिसरात शेलटोली गावात राहत होते. वर्षभरापूर्वी हे कुटुंब शेलटोली येथे राहण्यास गेले होते. मात्र यापूर्वी हे कुटुंब खरवली येथे राहत होते. ज्या विहिरीत या मुलांना ढकलून दिले तिथपासून शेलटोली हे गावाचे अंतर  जवळपास सहा किमीच्या वर आहे. मात्र खरवली गावात राहिल्याने विहीर आणि परिसराचा अंदाज या महिलेला असावा यामुळे या महिलेने पूर्वी राहत असलेल्या खरवली गावातील या विहिरीवर या महिलेने आपल्या पोटच्या मुलांना घेवून आली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

विहिरीच्या मालकाने या महिलेला परतत असताना पहिल्याने हा प्रकार उघड झाला आहे. यामुळे सदर विहीर मालकाची फिर्यादी म्हणून नोंद पोलिसांनी घेतली आहे. एक वर्षापूर्वी हे कुटुंब खरवली ढालकाठी येथे राहत होते असे विहीर मालक महादेव शिर्के यांनी सांगितले. हे टोकाचे पाउल सदर महिलेने का उचलले याबाबत शंका कुशंका उपस्थित होत आहेत. सहा मुलांना एक महिला विहिरीत कशी काय ढकलून देवू शकेल ? एका मुलाला ढकलून दिल्यानंतर अन्य मुले का पळाली नाहीत ? स्वतः यातून कशी बचावली अशी अनेक प्रश्नांची उकल होण्याची चिन्हे आहेत. महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात या महिलेच्या विरोधात भाद्वी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा बनाव देखील पोलिस तपासात पुढे आला आहे. 

महाड मध्ये औद्योगिक क्षेत्र असल्या कारणाने याठिकाणी अनेक राज्यातील कुटुंब पोटाची खळगी भागवण्यासाठी मिळेल ते काम करताना दिसतात. शिक्षणाचा अभाव असलेले हे बहुतांश तरुण उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा आदी बाह्य राज्यातून मजूर, कंत्राटी कामगार, बांधकाम कारागीर, आणि औद्योगिक कंपन्यात लागणारे कामगार मोठ्या संख्येने आले आहेत. शैक्षणिक अभाव असल्याने हे तरुण, महिला मिळेल ते काम करून आपले जीवन जगत आहेत. दिवसभराची मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण, राहत्या घराचे भाडे, वीज बिल, आदी खर्च भल्या भल्यांना न परवडणारा झाला असतानाच अशा मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाना आपले कुटुंब जगवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लगत आहे. यातून मानसिक ताणतणाव निर्माण होवून व्यसनाधीनता वाढीस लागली आहे. शेकडो मिल अंतरावरून आलेल्या या कुटुंबाकडे लक्ष देणारे कोणीच नसते. याचा परिणाम कौटुंबिक कलह वाढीस होत असून काल घडलेल्या घटनेत देखील प्राथमिक तपासात कौटुंबिक कलह हे कारण पुढे आणले आहे. महाड औद्योगिक पोलीस याबाबत अद्याप स्पष्टीकरण देवू शकलेले नाहीत मात्र याचा सखोल तपास होणे अपेक्षित आहे.

No comments