१७ वर्षीय तरुणीचा दरीत पडून मृत्यू
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड ,ठाणे
टेकडीवर, डोंगरावरून जाऊन सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. अशा घटनांमधून कोणताही बोध न घेता अनेकदा तरुणाई बिनधास्तपणे स्टंटबाजी करत टेकडीच्या टोकावर जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. पण कोणतीही काळजी न घेतल्याने जीव गमावण्याची वेळ त्यांच्यावर येते. असाच प्रकार ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये घडला आहे. गडावर सेल्फी काढताना तोल जाऊन खोल दरीत पडल्याने १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दामिनी ज्ञानेश्वर दिनकरराव असं या तरुणीचं नाव असून मुरबाडच्या गोरखगडावर हा प्रकार घडला. शहापूर तालुक्यातील उंभ्रई गावात दामिनी राहते. ती तिच्या काही मित्रांसोबत मुरबाड तालुक्यातील गोरखगडावर दुपारच्या सुमारास गेली होती. त्यावेळी गडावरील एका ठिकाणी ती मोबाईलमध्ये सेल्फी काढत होती. त्याचवेळी दरीच्या कडेला उभी असताना मोबाईलमध्ये सेल्फी काढताना तिचा तोल जाऊन ती गडावरून दरीत पडली. घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलीस, जीवरक्षक दलाचे शहापूर गट आणि स्थानिक देहरी गावकऱ्यांच्या मदतीने दरीत शोध मोहीम सुरु केली. या तरुणीची शोध मोहीम रात्री उशिरापर्यंत राबवण्यात आली. तरुणीचा मृतदेह सापडला असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली.
No comments