राज्यातील मासेमारी यांत्रिकी नौकाधारकांना दिलासा; डिझेल परताव्याचे ११ कोटी वितरित करण्यास वित्त विभागाची मान्यता
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
राज्यातील यांत्रिकी मासेमारी नौकांना डिझेल परताव्याचे उर्वरित रु.११ कोटी वितरित करण्यास वित्त विभागाने सहमती दर्शवली असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी आज दिली.२०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कर (VAT) प्रतिपूर्ती या योजनेसाठी याआधी रु.६० कोटींची तरतूद करण्यात आली होती, आता हा निधी पूर्णत: वितरित करण्यात आलेला आहे. हिवाळी अधिवेशनात डिझेल परताव्यासाठी रु.५० कोटी निधी मंजूर करण्यात आला. पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या रु.५० कोटी निधीपैकी ३९ कोटी निधी वितरित करण्यास वित्त विभागाने नुकतीच सहमती दर्शविली होती. त्यानंतर आता उर्वरित रु.११ कोटी निधी वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. आधीच्या सरकारच्या काळात डिझेल परताव्याचा अनुशेष १६३ कोटींच्या घरात गेला होता. हा अनुशेष भरुन काढत आतापर्यंत रु. २१०.६५ कोटींपर्यंत डिझेल परताव्यासाठी निधी मत्स्यव्यवसाय विभागाने वितरित केला आहे. चालू आर्थिक वर्षात ६० कोटींपर्यंत निधी वितरित करण्यात आला आहे, असे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
No comments