web-ads-yml-728x90

Breaking News

संत झेवियर्स महाविद्यालयाच्या,मराठी वाङ्मय मंडळाचा उत्सव "आमोद'२२"मय वातावरणात संपन्न

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

यंदा ९९ व्या वर्षात पदार्पण केलेले संत झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ हे मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील सर्वात जुने सांस्कृतिक मंडळ आहे. या महाविद्यालयात वर्षभर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते, यातीलच प्रमुख असलेला “आमोद'२२” हा वार्षिक आंतरमहाविद्यालयीन उत्सव “अखंड परंपरा, अतूट वारसा” या संकल्पनेसह दिनांक ३ ते ५ मार्च दरम्यान पार पडला. यंदाचे आमोदचे हे सलग ९ वे वर्ष होते.शैक्षणिक वर्ष २१-२२ मधील सर्व कार्यक्रमांचे मंडळाने ऑनलाईन माध्यमांद्वारे आयोजन केले होते. त्यानुसार आमोद ही ऑनलाइन स्वरूपातच साजरा झाला. आमोद म्हणजे निव्वळ आनंद जो पसरवण्याचा म. वा. मं. चा नेहमीच प्रयत्न असतो आणि याच नावाला अगदी शोभणारे 'स्पार्कल्स, द सनफ्लावर' नावाचे मॅस्कॉट निवडले गेले होते.

 कला, नाट्य, संगीत, नृत्य, साहित्य अशा सर्व विभागातील स्पर्धांनी यंदाचा आमोद बहुरंगी नटला होता. तब्बल एकूण १८ निरनिराळ्या स्पर्धांचे आयोजन या ३ दिवसीय उत्सवात केले होते. मुंबई व इतर परिसरातील साधारण २० पेक्षा जास्त महाविद्यालयातील ५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी या वार्षिक उत्सवामध्ये सहभाग दर्शविला. आमोद आता सातासमुद्रापार पोहोचला असून, USA मधून सुद्धा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.दिनांक १३ फेब्रुवारी रोजी “ताल: जागर लोककलेचा” या उद्घाटन पूर्व समारंभाचे आयोजन केले होते. भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर जी यांना सुरेल आदरांजली या Musical Concert च्या माध्यमातून वाहण्यात आली. याप्रसंगी सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक समीर सप्तिस्कर व मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर विख्यात लोककलावंत कृष्णाई ओवळेकर यांची विशेष परफॉर्मर म्हणून उपस्थिती होती.  आमोदच्या स्पर्धांना दिलीप प्रभावळकर, दिपाली विचारे, संभाजी सावंत, इला भाटे, संयोगिता भावे, अरविंद बेलवलकर, सचिन देशपांडे, गणेश आचवल असे दर्जेदार परीक्षक लाभले होते. महोत्सवाच्या मुख्य दिवसांपूर्वी विविध परीक्षकांनी इंस्टाग्राम लाईव्ह च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अगदी मनमोकळ्या गप्पा देखील झाल्या."आमोद म्हणजे आनंद. वर्ष online प्रणाली द्वारे सगळे कार्यक्रम करत असताना लय भारी आमोद चा हा भव्य आनंदमय सोहळा आम्हाला प्रत्यक्ष रित्या साजरा करता आला. 

अखंड परंपरा अतूट वारसा म्हणणार्‍या आमोद'२२ चे  मुख्य सचिव म्हणुन नेतृत्व करायला मिळाले आणि वर्षभर या पदाद्वारे मंडळासाठी काहीतरी वेगळं करून हा वारसा पुढे न्यायला मिळाला हे मी माझे अहोभाग्य समजते व हा वारसा असाच पुढे कायम राहील अशी आशा बाळगते." असे मंडळाच्या वर्ष २१-२२ ची मुख्य सचिव कु. तिर्था सामंत हिने,आमोदच्या सांगता समारंभावेळी मनोगत व्यक्त केरताना सांगितले.आमोद'२२ च्या करंडकावर नाव कोरण्यासाठी २० पेक्षा जास्त महाविद्यालयांची चुरस असताना,  रूइया कॉलेजने अंतिम विजेतेपदाला गवसणी घातली. तर के. सी. व  पोदार कॉलेज यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय उपविजेतेपद पटकावले. सर्वोत्कृष्ट CL व ACL चा बहुमान फर्ग्युसन कॉलेज ची प्राजक्ता भावसार व शॅलुन मोंटिरो यांनी अनुक्रमे मिळवला. फॉक्सटेल हे आमोद '२२ चे मुख्य प्रायोजक होते.

No comments