सामाजिक कार्यात स्थानिकांचा सकारात्मक सहभाग आवश्यक – रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे तांबाटी येथे कॅन्सर हॉस्पीटल व रिसर्च सेंटर उभारण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्याकडून मागणी प्राप्त झाली आहे. कॅन्सर या आजारावर सर्वसामान्यांसाठी होत असलेल्या आरोग्यसेवेसाठी व याप्रमाणे जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक जनहितार्थ कार्याचे नेहमीच स्वागत असल्याचे उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले.खालापूर तालुक्यातील मौजे डोणवत व मौजे तांबाटी येथील जागेची मागणी कॅन्सर हॉस्पीटल व रिसर्च सेंटरकरिता टाटा मेमोरियल सेंटर यांनी महसूल विभागाकडे केली आहे. याबाबत पुढील कार्यवाहीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीमध्ये पालकमंत्री कु. तटकरे बोलत होत्या.उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, ग्रामपंचायत हद्दीतील या जागेबाबत सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात यावा. ग्रामस्थांना नागरी सुविधांसाठी आवश्यक असलेल्या जागेव्यतिरिक्त सविस्तर सर्वेक्षण अहवाल त्वरित सादर करावा. सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक कार्यासाठी स्थानिकांचा सकारात्मक सहभाग असावा. त्याबाबत ग्रामपंचायत पातळीवर स्वागताची भूमिका कायम असावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
No comments