web-ads-yml-728x90

Breaking News

भिवंडी तालुक्यातील डुंगे गावाच्या गावठाणाची ड्रोनद्वारे सर्वेक्षणाची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुरुवात

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - भिवंडी ,ठाणे

स्वामित्व योजनेअंतर्गत भिवंडी तालुक्यातील मौजे डुंगे गावाच्या गावठाण हद्दीच्या ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते आज झाला. ड्रोन सर्वेक्षणामुळे गावठाणांना मिळकत पत्रिका मिळणार आहे. त्यामुळे भिवंडी तालुका व डुंगे गावाच्या विकासासाठीचे ऐतिहासिक पाऊल असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी यावेळी केले. 

भूमी अभिलेख विभागामार्फत स्वामित्व योजनेअंतर्गत राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांच्या जमिनीचे जीआयएस आधारित ड्रोन सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्य सर्वे ऑफ इंडियाकडून ठाणे जिल्ह्याला दोन ड्रोन मिळाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वेक्षणाची सुरुवात कल्याण तालुक्यातून झाली आहे. आज भिवंडी तालुक्यातील डुंगे गाव व शहापूर तालुक्यातील मौजे विठोबाचे गाव या ठिकाणी ड्रोन सर्वेक्षण सुरू करण्यात आले. याचा आढावा डुंगे गाव येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक बाबासाहेब रेडेकर, तहसीलदार आदिक पाटील आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी ड्रोन सर्वेक्षणाची माहिती घेतली. तसेच ड्रोनच्या सहाय्याने कशा प्रकारे मोजणी होते, त्याची नोंद कशा प्रकारे ठेवली जाते, याविषयी माहिती घेतली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री. नार्वेकर म्हणाले की, राज्य शासन लोकांचे हित समोर ठेवून अनेक योजना राबवित असतात. या योजनांना ग्रामस्थांचे सहकार्य मिळणे आवश्यक असते. भूमी अभिलेखच्या वतीने होणाऱ्या ड्रोन सर्वेक्षणास डुंगे ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले आहे. या सर्वेक्षणामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या गावठाणाची मोजणी होणार असून गावठाणाचे भूमापन होऊन मिळकत पत्रिका मिळणार आहे. गावातील रस्ते, मैदाने, खासगी मालमत्ता यांची कागदोपत्री नोंद होणार असल्यामुळे पुढील काळात गावाच्या विकासासाठी सुगोग्य नियोजन करता येणार आहे.

आधुनिक पद्धतीने ड्रोन सर्वेक्षण होणारे भिवंडी तालुक्यातील डुंगे हे गाव पहिलेच असल्यामुळे त्याची नोंद कायम राहणार आहे. ठाणे शहरालगत असणाऱ्या गावांचा विकास होण्याची क्षमता मोठी आहे. डुंगे गावातील सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर इतर गावातील गावठाणांचेही सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही श्री. नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील एकूण 719 गावांमध्ये भूमापन करण्यात येणार आहे. त्यापैकी 555 गावांमध्ये ड्रोन फ्लाईंग पूर्ण झाली आहे.भूमी अभिलेख उपअधिक्षक प्रमोद जठार, संग्राम जोगंदड,मीना पांढरे, योगेश सावकार, राजेंद्र लोंढे, डुंगे गावच्या सरपंच लक्ष्मी गणेश पाटील, उपसरपंच जितेंद्र दयानंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य निलेश भगत, शैलेश पाटील, छत्रपती अनंत पाटील, शर्मिला पाटील, जयश्री पाटील, कांता भगत, स्नेहल विजय भगत, मंडळ अधिकारी भास्कर टाकवेकर आदी यावेळी उपस्थित होते.

No comments