web-ads-yml-728x90

Breaking News

कुपोषणमुक्त मुंबईसाठी ७१ नागरी बाल विकास केंद्र कार्यान्वित – महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुंबईत एकूण 71 नागरी बाल विकास केंद्र कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती, महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. पहिल्या चेंबुर नागरी बाल विकास केंद्र येथून प्रातिनिधिक स्वरूपात या केंद्रांचे उद्घाटन एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या हस्ते झाले. मुंबईतील एम पूर्व व एम पश्चिम या प्रभागांतर्गत चेंबुर, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, ट्रॉम्बे व मुलुंड पूर्व या 6 प्रकल्पांमध्ये एकूण 71 नागरी बाल विकास केंद्र कार्यान्वित झाले आहेत.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत मुंबई विभागात एकूण 33 बाल विकास प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये 5 हजार 130 अंगणवाड्या नागरी झोपडपट्टी क्षेत्रात सुरू आहेत. मुंबईतील एम पूर्व व एम पश्चिम या प्रभागामध्ये अति कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे समजल्यानंतर या मुलांवर उपचार करण्यासाठी ऑगस्ट 2021 मध्ये शताब्दी रुग्णालय, गोवंडी या ठिकाणी पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) सुरू करण्यात आले होते. यामध्ये मुलांचे वजन, उंची, दंड घेर याची बालरोग तज्ज्ञांकडून तपासणी करून, अति तीव्र कुपोषित मुलांची नोंद करण्यात येते व या मुलांच्या पालकांना आहार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येते.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून ऑगस्ट ते डिसेंबर 2021 अखेर एकूण 1100 मुलांची तपासणी केली असता 373 अति तीव्र कुपोषित मुले आढळून आली. मुलांचे अंगणवाडी क्षेत्रातच श्रेणीवर्धन व वाढ होण्याकरिता ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी भागात नागरी बाल विकास केंद्र (UCDC) सुरू करण्याचे निर्देश महिला व बाल विकास ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. मंत्री ॲड. ठाकूर यांच्या निर्देशानुसार मुंबईतील एम पूर्व व एम पश्चिम या प्रभागांतर्गत चेंबुर, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, ट्रॉम्बे व मुलुंड पूर्व  या 6 प्रकल्पांमध्ये एकूण 71 नागरी बाल विकास केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यापैकी पहिल्या चेंबुर नागरी बाल विकास केंद्र येथे उद्घाटनप्रसंगी आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अंगणवाडी क्षेत्रातील अति तीव्र कुपोषित मुलांच्या पालकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. तसेच या मुलांच्या वजनात वाढ होऊन त्यांचे श्रेणीवर्धन होण्यासाठी वैज्ञानिक पध्दतीने तयार केलेला ऊर्जायुक्त पोषण पूरक आहार (energy dense nutritious food) मुलांच्या पालकांना सुपूर्द करण्यात आला.

No comments