web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई महानगर पालिका निवडणुक २०२२ नवीन प्रभाग पुनर्रचना; आगरी सेना मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री.जयेंद्रदादा खुणे यांची भूमिपुत्रांसाठी मागणी

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

आगरी सेना प्रमुख श्री. राजारामजी साळवी साहेब यांनी मुंबई प्रदेशच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी आगरी समाजाचे आक्रमक नेते श्री. जयेंद्रदादा खुणे यांच्यावर दिली असल्याने त्याचे सर्व स्थरावरून स्वागत करण्यात येत आहे. आगरी सेना मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री. जयेंद्रदादा खुणे यांनी मुंबई महानगर पालिका निवडणुक -२०२२ च्या प्रभाग पुनर्रचनाबाबत सूचना व हरकती घेवून आवाज उठविला आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुक २०२२ च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पुनर्रचनेबाबत  महापालिका प्रशासनातर्फे पाठविण्यात आलेल्या पुनर्रचनेच्या आराखड्याला राज्य निवडणुक आयोगाने नुकतीच प्राथमिक  मंजुरी दिली आहे. प्रारूप आराखड्यासंदर्भात हरकती व सूचना मागविण्याबाबत निवडणुक आयोगाने महापालिका आयुक्तांना पत्र दिलेले आहे. मुंबई महापालिकेचा प्रारूप आराखडा ओबीसी आरक्षण वगळून सूचना हरकतीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये २२७ ऐवजी आता २३६ वॉर्ड असणार आहेत. यामध्ये ओबीसी आरक्षण संदर्भात कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी जागा या खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. प्रारूप आराखड्यानुसार मुंबई महानगरपालिकेत नव्याने वाढणाऱ्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग शहर भागात तीन, पश्चिम उपनगरात तीन व पूर्व उपनगरात तीन असे वाढले आहेत. १) शहर भागात - वरळी,परळ,भायखळा , २) पश्चिम उपनगरात - बांद्रे, अंधेरी, दहिसर, ३) पुर्व उपनगरात - कुर्ला ,चेंबूर, गोवंडी हे नवे प्रभाग आहेत. या प्रारूप आराखड्यानुसार मुंबई महापालिकेत खुला प्रवर्ग -२१९ , एसीसी - १५ ,  एसटी - २ असे एकूण २३६ वॉर्ड असतील.

          सन २०१७ च्या पालिका निवणुकीनंतर हद्दीत झालेले बदल , क्षेत्र समाविष्ट करणे अथवा बदलणे, विविध विकासकामे योजनांमुळे झालेले भौगोलिक बदल (उदा. इमारती, नवीनरस्ते,पुल, वस्त्या, नाळे) यांची नोंद संबधित प्रभागात घेण्यातआली असुन त्या आधारे या आराखड्यात प्रभागाच्या सीमारेषा निश्चित करण्यात आल्या आहेत. हे बदल करताना जवळपास सर्वच वॉर्डामध्ये उलथापालथ झाल्याचे दिसुन येते. ९ प्रभागवाढीमुळे जुन्या प्रभागामधील लोकसंख्या आणि सीमारेषा पुढच्या किंवा आजूबाजूच्या प्रभागात सरकत पुढे गेली आहे. बहुसंख्य प्रभागांचे दोन,तीन,चार पेक्षा अधिक तुकडे पडल्याने मूळचा प्रभाग गायब होवुन नवीन प्रभाग निर्माण झाला असल्याचे मुंबईतील मूळ भूमिपुत्रांचे म्हणणे आहे.

             मुंबईतील मूळ भूमिपुत्र असलेले आगरी, कोळी, ईस्ट इंडियन, भंडारी, आदिवासी ह्यांचा गावठाण, कोळीवाडे, भांडारवाडे, ईस्ट इंडियन गावे , आगरी वस्त्या - पाडे यांना पुनर्रचनेत स्थान न देताना त्यांची विभागणी करून प्रभागाची पुनर्रचना केल्याचे भूमिपुत्रांमध्ये नाराजीचे वातावरण आहे .

       मुंबईतील एकुण ९४ आगरी वस्त्या,गावठाणे,,कोळीवाडे, भांडारवाडे, ईस्ट इंडियन गावे, तसेच आदिवासी पाडे आहेत.  मुंबईतील मूळ भूमिपुत्रांच्या रुढी, परंपरा, संस्कृती, राहणीमान, जीवनशैली तसेच गांवठाण, कोळीवाडे आणि पाडे यांची रचना तसेच समस्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. गावंठाण, कोळीवाडे आणि पाड्यांचे विभाजन न करता त्यांना एकत्र ठेवावेत. त्यामूळे त्यांच्या नैसर्गिक सामाईक समस्या सोडविताना सोपे जाईल व प्रभागात नागरी सुख सुविधा चांगच्या प्रकारे होवु शकतील , तसेच भूमीपुत्रांच्या समस्या जाणणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. जर मूळ भूमीपुत्रांची गावठाणे, पाडे आणि कोळीवाडे विभागल्यास आमच्या सामाईक संस्कृती, परंपरा , रुढी आणि समस्यांबाबत दुर्लक्ष होऊन त्याची जाण नसणारा प्रतिनिधी आमच्यावर लादला जाईल.

            देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यकआहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांनी निवडणुकीत मतदाराचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. लोकशाही व्यवस्थेमध्येच भयमुक्त व निःपक्षपाती वातावरणात निवडणुक पार पडणे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक आहे. मतदारांमध्ये जनजागृती व प्रबोधन होण्यास मोलाची मदत व्हावी आणि भारतीय लोकशाही अधिक सक्षम, बळकट व लोकाभिमुख व्हावी यासाठी मुंबई महानगर पालिका निवडणूक २०२२ च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेत मूळ भूमिपुत्रांना विचारात व विश्वासात न घेता पुनर्रचना केली गेलेली असल्याचे मुंबईतील मूळ भूमिपुत्रांच्या व संघटनांचे म्हणणे आहे.

       मुंबईतील मूळ गावठाण वासीयांची गांवठाणे, कोळीवाडे, भंडारवाडे, आदिवासी पाडे आणि ईस्ट इंडियन गावठाणे एकत्रित एकाच प्रभागात राहावी किंवा एकच प्रभाग असावा अशी प्रभागाची रचना करावी. अशा प्रकारची आगरी सेना मुंबई अध्यक्ष श्री. जयेंद्र दादा खुणे यांनी मा.सहायक निवडणूक व नगर शुल्क अधिकारी, निवडणुक कार्यालय, मुंबई यांच्याकडे लेखी पत्राद्वारे सूचना व हरकत घेवून मागणी केली आहे . त्याचप्रमाणे मुंबई महानगर पालिका प्रभागाची पुनर्रचना करताना सदर बाबतीत विचार विनिमय करण्यासाठी सदर मूळ भूमीपुत्रांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेवून प्रभागाची पुनर्रचना करावी व शिष्टमंडळास  बोलवावे अशी भूमिपुत्रांच्या वतीने आगरी सेना मुंबई अध्यक्ष श्री. जयेंद्र दादा खुणे यांच्या या मागणीमुळे मुंबईतील मूळ आगरी ,कोळी, मच्छीमार,आदिवासी, भंडारी, कुणबी समाजाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

-----------------------------------------------------

 सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

-----------------------------------------------------

     नवीन प्रभाग पुनर्रचनेवर मुंबईकरांना १४ फेब्रुवारी २०२२ दुपारी ३ वाजेपर्यंत महापालिकेकडे सूचना व हरकती पाठवता येतील. यासाठी पत्ता : सहायक निवडणुक व नगरशुल्क अधिकारी , जे.बी.शाह मंडई, ४ था मजला, युसूफ मेहर अली मार्ग मशीद बंदर ( पश्चिम ) , मुंबई- ४०००९ येथे पालिकेचा २४ प्रभागातील करनिर्धारण व संकलन विभागातही सूचना व हरकती देता येतील. तसेच संबधित प्रभागांचे इग्रजी आद्याक्षर लिहून मेल करता येतील. ( उदा. ए वार्ड ) ac.a@mcgm.govt.in याप्रमाणे ए ते टी प्रभागांचा ई मेल आयडीत उल्लेख करावा .

No comments