शासकीय विधी महाविद्यालयात “आझादी ७५” उत्सव उत्साहात
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
मुंबईतील नामांकित विधी संस्था आणि आशियातील सर्वात जुने शासकीय विधी महाविद्यालय येथे भारताच्या संविधान सभेच्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने महाविद्यालयात “आझादी ७५” हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात १५ ऑगस्ट २०२१ ते २६ जानेवारी २०२२ यादरम्यान ७५ विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य यांनी केले आहे.नुकतेच “आझादी ७५” या उत्सवाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. “भारतातील घटनात्मकता (Constitutionalism in India) या विषयावर संबोधित करताना माजी न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी म्हणाले, राज्यघटना ही संविधान सभेच्या सर्व सदस्यांच्या साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नांचे फलित आहे. भारताचा पाया रचण्यात संविधान सभेची आणि घटनात्मकतेची २१ व्या शतकातील भूमिका, लोकशाही, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता इत्यादी मुलभूत संविधानिक संकल्पना स्पष्ट करुन ते म्हणाले की, महान भारतीय राज्यघटनेसाठी आपण पात्र आहोत हे आपल्या कृतीतून आपल्याला सिद्ध करावे लागेल. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्या प्रत्येकाला ते खरे वंदन असेल, असेही श्री.धर्माधिकारी यांनी सांगितले. संविधान सभेची स्थापना, कार्ये आणि कार्यप्रणाली त्यांनी अतिशय सरळसोप्या शब्दांत विशद केली.शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, राज्यघटनेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई निश्चितपणे सर्वतोपरी प्रयत्न करेल. स्वत:चे कर्तव्य बजावण्यावर लक्ष द्यायला हवे. एक नागरिक आणि व्यक्ती म्हणून मी माझ्या देशाला काय देऊ शकतो याचा आपण विचार केला पाहिजे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
No comments