मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नगरपालिकांचे अभिनंदन
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली
महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार
मिळालेले आहेत. सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला
देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवडने दुसरा व तिसरा क्रमांक
प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या
शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या तीन नगरपालिकांना राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेले आहे. यासह महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविला
आहे.
पुरस्कार प्राप्त या सर्व नगरपालिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राची ही स्वच्छता चळवळीतील कामगिरी अभिमानास्पद आहे.
यातून राज्याची मान देशातच नाही तर जगातही गौरवाने उंचावली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.‘सुरवातीपासूनच
महाराष्ट्राने स्वच्छतेच्या चळवळीत अशी आघाडी ठेवली आहे. ग्रामीण क्षेत्रासह आता
नागरी क्षेत्रानेही स्वच्छता चळवळीला आपलेसे केले आहे. लोकसहभाग हा स्वच्छता
चळवळीचा आत्मा आहे. आपल्या राज्यात नागरिकांनी आवर्जून आणि सातत्यपूर्ण असा सहभाग
घेतला आहे. यामुळेच हे यश मिळविता आले आहे. या यशासाठी या नागरिकांचे कौतुक करावे
तेवढे थोडेच आहे. पुरस्कार प्राप्त सर्व नगरपालिकांचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे या निमित्ताने
अभिनंदन. स्वच्छतेची ही चळवळ अशीच अव्याहतपणे सुरू रहावी.त्यासाठी आपण सर्व एकजुटीने
करता येतील ते सर्व प्रयत्न करत राहूया, असेही
मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
No comments