हाजुरी येथील रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरीकांचे पुनर्वसन ; नगरसेवक विकास रेपाळे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे
ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 19 अंतर्गत हाजुरी येथील रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरीकांचे पुनर्वसन करण्यात आले असून, कासारवडवली येथील बीएसयुपी योजने अंतर्गत कायम स्वरुपी घरे उपलब्ध करुन दिली आहेत. यामध्ये हाजुरी येथील एकूण 30 बाधित नागरीकांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उप महापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका व वृक्षप्राधिकरण सदस्या नम्रता भोसले-जाधव व उपायुक्त अश्विनी वाघमळे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
हाजुरी येथील बाधितांचा प्रश्न मागील सन 2018 पासून प्रलंबित होता. याबाबत स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका तथा वृक्षप्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले-जाधव यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. यासाठी ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ठाणेकर नागरीकांनी नेहमीच शहराच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. हाजुरी येथील रस्त्याचे काम बरेच दिवस प्रलंबित होते. याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन सदर प्रश्न मार्गी लावला असून, येथील बाधित नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच या सर्व बाधित नागरीकांना कायमस्वरुपी घरे मिळाल्याबद्दल त्यांनी महापौर नरेश गणपत म्हस्के व नगरसेवक विकास रेपाळे यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
No comments