महाराष्ट्रातील सात अधिकारी व जवानांना संरक्षण अलंकरण सन्मान
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली
उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि उत्कृष्टसेवेसाठी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज वर्ष २०२१ चे संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचे सुपुत्र वायुदल प्रमुख विवेक चौधरी यांच्यासह राज्यातील सहा अधिकारी व जवानांनाही या सन्मानाने गौरविण्यात आले. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आज तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात ‘संरक्षण अलंकरण पुरस्कार -२०२१’ चे वितरण करण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी आयोजित या पुरस्कार वितरण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख तथा राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते अधिकारी व जवानांना कीर्ती चक्र, शौर्य चक्र, वीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक आदि सन्मानाने गौरविण्यात आले.
No comments