web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

ठाणे येथील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे रूपांतर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.  राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने हे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी  २१३ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे आधीचे ३१४ आणि आताचे २१३ असे ५२७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, त्यामुळे या रुग्णालयाचे काम आता लवकरच सुरू करण्यात येणार आहे.ठाणे जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून तिथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची आग्रही मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या मागणीचा सतत पाठपुरावा करून अखेर या रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधी मिळवून त्यांनी या रुग्णालयाच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.ठाण्यातील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीला आरोग्य विभागाने मंजुरी दिली होती. तसेच याठिकाणी अद्ययावत रुग्णालयात उभारण्यासाठी ३१४ कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र त्यानंतर याजागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी अतिरिक्त २१३ कोटी रुपयांची गरज होती. आज झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या सुधारित रक्कमेला मान्यता मिळाली आहे.

 

No comments