एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२०० रूपयांपर्यंत वाढ – मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिकांच्या पगारात सुमारे 7200 रुपयांपासून 3600 रूपयांपर्यत घसघशीत वाढ केली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री, अॅड. परब यांनी आज झालेल्या पत्रकार परीषदेत केली.एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक पगारवाढ आहे. तसेच यापुढे कामगारांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यत होण्याची हमी राज्य शासनाने घेतली आहे, असे सांगतानाच कामगारांनी आता संप मागे घेऊन तातडीने कामावर रूजू होण्याचे आवाहनही श्री. परब यांनी यावेळी केले.परब म्हणाले,एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचारी कामावर रूजू होऊन वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू व्हावी यासाठी कामगारांनी तातडीने कामावर रूजू व्हावे, तसेच संपकाळात निलंबित व सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कामावर रूजू व्हावे. कामावर रूजू होताच त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. परंतु, जे कर्मचारी कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे श्री. परब यांनी जाहीर केले. तसेच नव्याने झालेली वेतनवाढ नोव्हेंबरच्या पगारापासून देण्यात येईल, वेतनासाठी आवश्यक निधी राज्य शासन देणार असून पगार वेळेत देण्याची हमीही राज्य शासनाने घेतली आहे.असेही मंत्री, अॅड. परब यांनी यावेळी स्पष्ट केले.
No comments