अवयवदान वाढविण्यासाठी आराखडा तयार करा – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सूचना
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पण वाढण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत आढावा बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे झालेल्या या बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, प्रधान सचिव-2 निलीमा करकेटृटा, वैद्यकीय शिक्षण विभाग प्रधान सचिव सौरभ विजय, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त वीरेंद्र प्रताप सिंह, आरोग्य सेवा संचालक डॉ.साधना तायडे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर आदी उपस्थित होते.श्री.टोपे यांनी सांगितले की, राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत अद्यापही सुधारणा अपेक्षित आहे. सध्या राज्यातील प्रमुख शहरांमध्येच अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत कामकाज होते. पण याबाबत राज्यातील छोट्या शहरातही अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पण वाढायला हवे. अवयव दानाबाबत जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये अवयव दानाबाबत काम होते. शासकीय दवाखान्यातही अवयवदान व्हायला हवे. यासाठी एक आराखडा तयार करावा, असे निर्देशही श्री.टोपे यांनी दिले.
No comments