web-ads-yml-728x90

Breaking News

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर – गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर

राज्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणासोबतच बदलत्या काळातील गुन्ह्यांचे स्वरुप लक्षात घेऊन गुन्हे अन्वेषणाकरिता आधुनिक तंत्रज्ञान व साधनांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी पदभरती करण्यात येत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. नागपूर येथील वनामती सभागृहात आयोजित पोलीस विभागाच्या विविध इमारतींच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अभिजित वंजारी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.राज्यातील पोलीस दल कर्तव्यदक्ष आणि चाणाक्ष असून, कोविड काळात पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विपरित परिस्थितीतही कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लवकरच राज्यात पोलिसांसाठी एक लाख निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. याकरिता यंदा अर्थसंकल्पात 700 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये भविष्यात आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल, असे गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले. तसेच राज्य शासनाने महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला आहे. सोबतच मनुष्यबळ वाढविण्यासाठी बारा हजार पोलिसांची भरती करण्यात येत आहे. सध्या पाच हजार 200 पदांची भरती प्रक्रिया सुरु असून उर्वरित पदभरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments