सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन केली चौकशी
BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे
ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ला झाल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपचार घेत असणाऱ्या पिंपळे यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. दुपारी एकच्या सुमारास राज यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये जाऊन पिंपळे यांची भेट घेतली. यावेळी राज यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे, मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष शेलार, मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबतच इतर पदाधिकारीही होते. या भेटीनंतर राज यांनी रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. मात्र राज यांनी पिंपळे यांना भेटीदरम्यान एका वाक्यामध्ये अगदी मोजक्या शब्दा धीर दिल्याचं समजतं.
“मी आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. लवकर बरं व्हा एवढंच सांगितलं आहे,” असं राज ठाकरे यांनी पत्रकारांशी या भेटीनंतर बोलताना सांगितलं. तसेच फेरीवाल्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता राज यांनी, “आमचं आंदोलन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात असतं. मी काल जे म्हटलं त्याप्रमाणे, जे काही घडलं त्याचं निश्चितच दु:ख आहे. पण काळही सोकावतो. अशा प्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांची कारवाई करतच आहेत,” असं राज म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “न्यायालय देखील त्यांचं काम करेल अशी आमची पूर्ण अपेक्षा आणि आशा आहे,” असंही राज यांनी म्हटलं आहे. तसेच आपण कार्यकर्त्यांची भेट घेणार नसून मुंबईला परतणार असल्याचंही राज यांनी यावेळी स्पष्ट केलं.
No comments