web-ads-yml-728x90

Breaking News

कांदळवनाचे जतन करा, कांदळवन वृक्ष लागवड करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आला.यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अहवालानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात १०६ संवेदनशील ठिकाणी एकूण २७९ सीसीटीव्ही  कॅमेरे लावले जातील.  यासाठीची ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम व मध्य मुंबई व तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा समावेश आहे. आज वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  याच बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कांदळवन वाचवण्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी तसेच सागरतटीय भागात कांदळवन वृक्षाची लागवड करण्यात यावी अशा सूचनाही दिल्या. कांदळवन प्रतिष्ठानमार्फत विकसित करण्यात येत असलेले निसर्ग क्षेत्रे, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य आणि इतर उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पर्यटनाला चालना द्यावी असेही ते यावेळी म्हणाले.नियामक मंडळाच्या बैठकीस पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार वैभव नाईक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे  प्रधान सचिव विकास खारगे, वन‍ विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक वीरेंद्र तिवारी, महाराष्ट्र कांदळवन आणि सांगरी जैविविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाचे सदस्य, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments