घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट मोठे असले तरी हे काम पुण्य देणारे आहे आणि ते आपल्याला करावेच लागेल. २०२४ पर्यंत नळजोडण्यांचे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून त्याची सर्व यंत्रणांनी युद्ध पातळीवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत जलजीवन मिशन नियोजन व अंमलबजावणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला.‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ पी गुप्ता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, जलजीवन मिशनचे अभियान संचालक प्रवीण पुरी, सहसचिव चंद्रकांत गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments