web-ads-yml-728x90

Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत सापडण्याची शक्यता


BY : युवा महाराष्ट्र लाईव - मुंबई ।

मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राणेंच्या या वक्तव्यामुळे आता राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. नारायण राणेंविरोधात महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल झाला असून नाशिक पोलीस आणि पुणे पोलिसांचं पथक राणेंना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झालं आहे. दरम्यान नाशिकमध्ये भाजपा कार्यालयाची शिवसेनेकडून तोडफोड केली आहे. तर जुहूमध्येही शिवसैनिकांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. याच संदर्भात नारायण राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राणेंनी त्यांच्या शैलीत या हल्ल्यावर उत्तर दिलं आहे.

नाशिकमध्ये भाजपाचं कार्यलय फोडण्यात आलं याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता राणेंनी एक दोन दगड मारुन गेले हा काही पुरुषार्थ नाही, असा टोला लगावला. तसेच पुढे बोलताना त्यांनी आम्ही शिवसेनेपेक्षा डबल आक्रामक आहोत. त्यांनी ऑफिस फोडलं उद्या आमच्यातून कोणी घरापर्यंत गेलं तर…?? मग काय करणार? तुम्ही काय शिवसैनिकांचं सांगताय. ते शिवसैनिक गेले. नारायण राणेने जी शिवसेना सोडली ना ती शिवसेना गेलीय आता, असंही राणेंनी म्हटलं आहे.

शिवसेना आक्रामक झाल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर राणेंनी, “कोण शिवसेना? एखाद्या नेत्याचं नाव सांगा. कोण बडगुजर मी त्यांना ओळखत नाही, असा टोला राणेंनी गुन्हा दाखल झाल्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं. मी प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवणार नाही, असं म्हणत शिवसेनेने केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांना देशाचा अमृतमोहोत्सव माहिती नाही हा देशाचा अपमान आहे. राष्ट्रद्रोह आहे,” असं मत व्यक्त केलं.

मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. नाशिकच्या आयुक्तांनी काढलेलं लेटर आणि नोटीसमध्ये फरक आहे. तो काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला?, अशा शब्दांमध्ये नारायण राणेंनी नाशिकचं पोलीस पथक अटक करायला येणार असल्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं.

नारायण राणे यांना अटकेच्या आदेशासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा. नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार. गुन्हा नसताना पथक निघालं, अटक होणार सांगितलं जात आहे. मी काय साधा माणूस वाटलो का?,” अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन असा इशारा यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला.

No comments