web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड तहसील कार्यालयावर आदिवासी- कातकरींच्या मूलभूत हक्कासाठी 6 तास ठिय्या;मंत्र्यांच्या जनाशीर्वाद यात्रेच्या मार्गात कातकरी वाड्या नव्हत्या का..? - प्रमोद पवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यातील चार जिल्ह्यात आजचा दिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात आला. मुरबाड तहसील कार्यालयावर आज श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आणि प्रवक्ते प्रमोद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने आदिवासी कातकरी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. पंचायत समिती ते तहसील असे एक किलोमीटर पायी येत मोर्चाने थेट तहासिलच्या आवारात ठाण मांडले.आदिवासी कातकरी वाड्यांमधील मूलभूत समस्यांचा पाढा आज श्रमजीवीने तहसीलदार डॉ.अमोल कदम यांच्यासमोर मांडला. धसई येथील रेशनकार्ड धारकांचे 2 महिने न दिलेले रेशन आजच्या आज रेशन कार्ड धारकांना मिळायला हवे या मागणीसाठी तब्बल 6 तास ठिय्या धरत हे 85 लाभार्थ्यांचे रेशन यशस्वीपणे मिळवून श्रमजीवी ने पुरवठा विभाग आणि रेशन लॉबीला दणका दिला. 

1 ऑगस्ट पासून श्रमजीवी कार्यकर्ते तालुक्यातील प्रत्येक कातकरी वाडीत जाऊन येथील समस्यांची माहिती घेत आहेत, स्वतः विवेक पंडित यांनीही मुरबाड तालुक्याचा दौरा करत या समस्यांची पाहणी केली. आज याच माहितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील समस्या श्रमजीवी ने चव्हाट्यावर आणल्या. विकासाच्या वाऱ्या मध्ये कातकरी मात्र वंचित राहिलेला दिसत आहे. या भागाचे खासदार आणि  केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची परवा जन आशीर्वाद यात्रा मुरबाड मध्ये येऊन गेली, मंत्री महोदय येथील गरीब आदिवासी कातकरी मतदारांचेही प्रतिनिधित्व करतात, मग त्यांनी कातकरींचे आशीर्वाद घेतले का? जन आशीर्वाद यात्रेच्या वाटेत त्यांना या कातकरी वाड्या लागल्या नाही का? असा सवाल यावेळी श्रमजीवीचे प्रमोद पवार यांनी विचारला. कातकरी वाड्यांच्या प्रश्नावर या अमृत महोत्सवी वर्षात तोडगा निघायालाच हवा, आम्हीं 75 वर्ष वाट पाहिली आता प्रतीक्षा करणार नाही अशी भूमिका यावेंळी श्रमजीवी ने घेतली। पुराच्या पाण्यात घरदार भिजलेल्या बांधवाना विना विलंब रेशनकार्ड देण्याबाबतची मागणी आज मोर्चात होती, तातडीने हे रेशनकार्ड तहसीलदार डॉ.कदम यांनी तयार करून कातकरी कुटूंब प्रमुखाकडे सुपूर्द केले.

No comments