पावसाचा इशारा लक्षात घेऊन मुंबईतील यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगावी ; अनपेक्षितरित्या कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी सतर्क राहावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरित्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. आज त्यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील सूचना केल्या. यावेळी बोलतांना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असे सांगून महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ते म्हणाले की, पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, कोविडचा धोका तर कायम आहे, यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरु करा. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी देखील नागरिकांना त्यांच्या तापाबाबत तपासणी व मार्गदर्शन हवे. गृहनिर्माण संस्थांमधून देखील याविषयी जनजागृती करा.मुंबईत दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत मात्र अशा सर्वच ठिकाणांचा आयआयटी किंवा इतर तज्ज्ञ संस्थेमार्फत अभ्यास करून आणखी काही पर्याय आहेत का किंवा त्यांच्या मजबुतीकरणासंदर्भात पाऊले उचलता येतील का ते पाहावे. रेल्वे आणि बेस्ट यामध्ये अधिक चांगला समन्वय साधून अशा आपत्तीच्या वेळी प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून हॉटलाईन सुरु करावी.पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील पुढील तीन दिवस महत्त्वाचे असून मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु राहील याची काळजी घ्यावी व पर्यायी व्यवस्था करावी,असे सांगितले. वीज वाहिन्या व त्यांचे खांब सुस्थितीत राहतील आणि त्यातून विजेचा धक्का लागणार नाही याविषयी कंपन्यांना खबरदारी घेण्यास सांगावे असेही ते म्हणाले.
No comments