मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना दुर्दैवी;धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश – पालकमंत्री आदित्य ठाकरे
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रात्रीच प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांसाठी तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर विविध रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीच्या अशा प्रसंगी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन दुर्घटनाग्रस्तांना दिलासा देण्याचे आवाहन त्यांनी केले. दुर्घटनांची माहिती मिळताच पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी चेंबूरमधील भारतनगर, विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या दुर्घटनेत मुत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच परिसरातील रहिवाशांची भेट घेऊन त्यांनी शासनामार्फत सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.
No comments