web-ads-yml-728x90

Breaking News

तळीयेसाठी माळीणवासियांकडून मोठी मदत

BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे

महाड शहरात एकीकडे मुसळधार पाऊस आणि महापुराने होत्याचं नव्हतं केलं. तर दुसरीकडे तालुक्यातील तळीये मधलीवाडी गाव दरड कोसळल्यानं उद्ध्वस्त झालं. ही दुर्घटना पाहून 2014 सालच्या माळीणची अनेकांना आठवण झाली. तळीये गावात ढिगाऱ्याखालून तब्बल 53 मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं. मात्र, अद्यापही 32 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. पाच दिवसानंतर अखेर आज तळीयेतील बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. मात्र, बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी 25 हजाराची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली आहे.

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात 30 जुलै 2014 मध्ये असाच एक डोंगर काळ बनून कोसळला होता. रात्री झोपलेलं संपूर्ण गाव सकाळी नाहीसं झालं होतं. डोंगराचा कडा कोसळून 44 घरं गाडली गेली होती तर 151 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या 6 वर्षात या गावातील नागरिक पुन्हा एकदा उभे राहिले आहेत. माळीण गावातील नागरिकांना तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणून तळीयेतील ग्रामस्थांच्या मदतीसाठी मोठी मदत देऊ केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे माळीच्या ग्रामस्थांनी 25 हजाराचा धनादेश सुपूर्द केला आहे.

No comments