सिमेंट उद्योगातील कामगारांना नवीन किमान वेतनश्रेणी लागू करण्यास तत्वत: मान्यता – कामगारमंत्री हसन मुश्रीफ
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांच्या हितासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.विजय वडेट्टीवार यांनी केलेली मागणी लक्षात घेवून यासंदर्भातील परिपत्रकात बदल करुन या उद्योगातील कामगारांना नवीन किमान वेतन लागू करणारे परिपत्रक काढणे तसेच कामगारांना 21 हजार रुपये किमान वेतन लागू करण्यासंदर्भात तत्वत: मान्यता देण्यात येत असल्याचे कामगारमंत्री श्री.हसन मुश्रीफ यांनी सांगितले.सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योग यातील कामगारांना किमान समान वेतन लागू करण्यात आलेले आहे. सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना सध्या अल्प वेतन मिळत आहे. त्यामुळे या परिपत्रकात बदल करून किमान वेतन यादीमध्ये दुरूस्ती करावी व सिमेंट उद्योगातील कामगारांना एकवीस हजार रूपये किमान वेतन देण्यात यावे अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.मंत्रालयात कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या दालनात सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान वेतन वाढ करण्यासंदर्भातील परिपत्रकात दुरूस्ती करून कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंघल, कामगार आयुक्त श्री.कल्याणकर व इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
No comments