बकरी ईद सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन;भिवंडी मुंब्रा शहरातील पोलीस सज्ज १४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे
अद्यापही कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेली दिसत नाही. या कोरोना परिस्थितीमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशातच आता मुस्लिम बांधवाचा बकरी ईद हा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. दिलेल्या निर्बंधातील नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी भिवंडी मुंब्रा शहरातील पोलीस प्रशासन आपल्या कार्यास तयार झाली आहे.नागरिकांनी कोरोना काळामध्ये सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे. भिवंडी, मुंब्रा शहरात मशिदीमध्ये नमाज पठण होणार नाही. तर भिवंडी शहरातील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या ३८ कत्तलखान्यांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.
बजरंग दल आणि मुस्लीम संघटनांचीही पोलिसांनी बैठक घेऊन त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. भिवंडी आणि मुंब्रा या दोन्ही शहरात सुमारे १४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करणे टाळावे असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मुस्लीम बांधवांचा बकरी ईद हा सण येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी आणि मुंब्रा शहरात मोठय़ा प्रमाणात मुस्लीम बांधव राहतात. भिवंडीत सुमारे १०० हून अधिक मशिदी आहेत. तर सुमारे १२ लाख मुस्लीम बांधवांची या ठिकाणी लोकसंख्या आहे.शहरातील मशिदीत नागरिकांनी येऊन नमाज पठण करू नये म्हणून मशिदी परिसरात तपासणी नाके उभारण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ाभरापासून भिवंडीतील बजरंग दलाचे कार्यकर्ते, शांतता समितीतील नागरिक आणि मुस्लीम समुदायातील मौलानांची एकत्रित बैठक घेण्यात येत आहे. त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले जात आहे.
No comments