web-ads-yml-750x100

Breaking News

वर्तकनगर, भीमनगरवासियांची लसीसाठी फरफट दोन आठवड्यांपासून लसीकरण केंद्र बंद;नागरिकांची गैरसोय टाळा - मनसेची मागणी

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

वर्तकनगर आणि भीमनगरवासियांसाठी हक्काचे असलेल्या वर्तकनगरच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयातील लसीकरण केंद्र पालिका प्रशासनाने दोन आठवड्यांपूर्वी तडकाफडकी बंद केले. त्यामुळे हजारो रहिवाशांना लसीकरणासाठी द्राविडी प्राणायाम भोगावा लागत आहे. नागरिकांची ही फरफट थांबवून तात्काळ पर्यायी लसीकरण केंद्र या भागात उभारावे, अशी मनसेचे संदीप पाचंगे यांनी आग्रही मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.वर्तकनगर, साईनाथनगर आणि भीमनगर परिसरात एकूण वीस हजारांपेक्षा अधिक लोकवस्ती आहे. या भागातील नागरिकांसाठी गेल्या चार महिन्यांपासून योग्य पध्दतीने लसीकरण केंद्र वर्तकनगरच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयात सुरु होते. मात्र मागील दोन आठवड्यांपासून रुग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याचे कारण देत येथील लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना लसीकरणासाठी लोकमान्यनगर, बेथनी रूग्णालय जवळील लसीकरण केंद्राकडे धाव घ्यावी लागत आहे. या परिसरातील वृध्दांची तसेच महिलांची सध्या पावसाळ्याच्या काळात मोठी गैरसोय होत असून हे लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करावे या प्रश्नी मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाणे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर त्यांची भेट घेतली. यावेळी मनसेचे प्रभाग अध्यक्ष अमोल राणे आणि उपविभाग अध्यक्ष अमित मोरे उपस्थित होते.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती  सध्या राज्य सरकारकडून भविष्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वारंवार वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वर्तकनगर आणि भीमनगर परिसरातील नागरिकांचे लसीकरण वेगात होण्याची गरज आहे. मात्र अशा आणीबाणीच्या काळातच हक्काचे लसीकरण केंद्र बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने तत्काळ वर्तकनगर परिसरात पर्यायी लसीकरण केंद्र उभारावे, ही मागणी संदीप पाचंगे यांनी डॉ. वैजयंती देवगेकर यांना भेटून निवेदनाद्वारे केली.

No comments