web-ads-yml-728x90

Breaking News

खाडीच्या तोंडाशी मिळणाऱ्या नाल्याचं रुंदीकरण करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

ठाणे शहरलगतचे जे नाले खाडीला मिळतात त्यांचा तोंडाकडील भाग रुंद करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. आज झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शहरात सर्वत्र समाधानकारक नालेसफाई झालेली असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साठण्याच्या घटना घडलेल्या नाहीत. तसच महानगरपालिकेने जागोजागी पाणी शोषून घेण्यासाठी पंप तैनात केल्यामुळे जास्त काळ पाणी साचून राहण्याची घटना घडलेली नाही. मात्र तरीही पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला असल्याने त्याअनुषंगाने सारी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. त्यासोबतच गरज लागल्यास 'एनडीआरएफ' ची पथके बोलावण्यासोबतच 'टीडीआरएफ'ची पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना श्री. शिंदे यांनी ठाणे मनपा आयुक्ताना केल्या. ठाणे शहरात अवघ्या सहा तासात 120 मामी पाऊस पडला असल्याने आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता कशी आहे याची श्री. शिंदे यांनी पाहणी केली. त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांना झाडे पडणे, वीज पुरवठा खिंडीत होणे, पाणबुडे तैनात करणे याबाबत सूचना केल्या. यावेळी श्री. शिंदे यांच्यासोबत ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपुल्ले आणि ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

No comments