0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

नागपूर महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील बंद असलेल्या महाराष्ट्र अँटिबायोटिक अँड फार्मास्युटीकल लिमिटेड (एमएपीएल) या औषध निर्मिती कंपनीला पुनर्जीवित करून त्याचे रूपांतर ऑक्सिजन व औषध निर्मिती युनिटसह जंबो कोव्हिड सेंटरमध्ये करण्याची विनंती राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ही कंपनी महाराष्ट्र सरकारने अधिग्रहित करावी, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी केली आहे.मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात डॉ.राऊत यांनी एमएपीएलला पुनर्जीवित करण्याची योजनाही मांडली आहे.राज्य सरकार व केंद्र सरकारच्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्या संयुक्त उपक्रमातून १९८० साली एमएपीएलची स्थापना करण्यात आली होती. तेथे जीवनावश्यक औषधे व जेनेरिक मेडिसीन्सची निर्मिती कऱण्यात येत असे. परंतु सन १९९५-९६ साली ही कंपनी तोट्यात आल्याने बंद करण्यात आली होती.सध्या कोरोना महामारीने देशात सर्वत्र थैमान घातले असून बंद असलेल्या या औषध निर्मिती कंपनीच्या इमारतीत व जागेत अल्पावधीतच ऑक्सिजन व कोरोना आजारावरील प्रभावी औषधे जसे रेमडेसिवीर तसेच कोरोना प्रतिबंधक कोवॅक्सिन लसीची निर्मिती करणे शक्य आहे. सोबतच या कंपनीच्या इमारतीत कोरोना हॉस्पिटल अल्पावधीतच चालू करणे शक्य असल्याचेही डॉ.राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Post a Comment

 
Top