0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – सोलापूर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले आहे. लहान मुलांचा एचबी कमी असल्यास त्यांना अधिक संसर्ग होण्याची भीती असल्याने जिल्ह्यातील 18 वर्षे वयाखालील सर्व मुलांची हिमोग्लोबिन तपासणी करणार असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.श्री. भरणे म्हणाले, कोरोनाचा लहान मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी सतर्क राहावे. पालकांनाही काळजी घेण्याच्या सूचना द्याव्यात. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात 0 ते 18 वयोगटातील बालके 11 लाख 92 हजार एवढी असून लहान मुलांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 40 बेडची सोय करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 13 लहान मुलांचे दवाखाने अधिग्रहित करण्यात आले असून यामध्ये 240 बेडची तात्पुरती सोय केली आहे. सोलापूर शहरात 16 दवाखाने अधिग्रहित करून यामध्ये 409 बेडची सोय करण्यात आली आहे. पालकांनी घाबरून न जाता मुलांचा आहार, स्वच्छता याकडे लक्ष द्यावे. सुविधायुक्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ऑक्सिजनचे बेड देऊन कोरोनाग्रस्त लहान मुलांची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

Post a Comment

 
Top