web-ads-yml-728x90

Breaking News

बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांसाठी निर्भया फंडातील रक्कम मिळण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

बालविवाह ही ज्वलंत समस्या असून कोरोनाकाळात तीव्रतेने समोर आली आहे. हा स्त्री बालकांच्या संरक्षणाचा विषय आहे; त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांसाठी देखील निर्भया फंडातील रक्कम मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.कोरोना कालावधीमध्ये बालविवाह रोखण्यासाठी राज्याने केलेल्या विशेष कामगिरीबद्दल ऑनलाईन संवादाचे (वेबिनार) आयोजन मंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेबिनारमध्ये महिला व बालविकास आयुक्त श्रीमती पवनीत कौर, सहायक आयुक्त तथा महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती मनिषा बिरारीस, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती मंजुषा कुलकर्णी यांच्यासह बालविवाह रोखण्यासाठी चांगली कामगिरी केलेल्या जिल्ह्यांचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सहभागी झाले.महाराष्ट्र राज्याने गतवर्षी सुरू झालेल्या कोरोना आपत्ती काळापासून 560 बालविवाह रोखून मोठे अभिनंदनास पात्र असे काम केले आहे, असे सांगून मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, यामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आपल्याला यामध्ये अजून खूप काम करण्याची गरज आहे. जिथे माहिती मिळाली तेथे बालविवाह रोखता आले; परंतु, माहिती (रिपोर्टिंग) मिळाली नाही अशा ठिकाणी बालविवाह झाले असण्याची शक्यता आहे. त्यासाठी रिपोर्टिंग व्यवस्था कार्यक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी ग्राम बाल संरक्षण समित्यांचे प्रशिक्षण घेऊन, ग्रामसेवक, पोलीस यंत्रणा यांच्याशी समन्वयाने काम करावे. जनजागृतीसाठी प्रचार आणि प्रसार साहित्य, सोशल मीडिया, कलापथके, नाट्यकृती अशा बाबींवर भर द्यावा. कोरोना काळात ऑफलाईन प्रशिक्षणाला मर्यादा आल्या असल्या तरी ऑनलाईन प्रशिक्षणाचा पर्याय अवलंबावा, असेही ऍड. ठाकूर म्हणाल्या.

 

No comments