कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कोणत्याही परिस्थितीत अचानकपणे वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्या- लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे महावितरणला निर्देश
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कोविड-19 बाधित रुग्ण शासकीय तसेच खाजगी रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत आहेत. त्यामुळे या काळात अचानकपणे वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता महावितरण विभागाने घ्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.मागच्या काही दिवसात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मंत्रालयातून दुरदृष्य प्रणालीद्वारे लातूर जिल्हा प्रशासन, महावितरणचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली.याप्रसंगी सूचना देताना पालकमंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले की, मागच्या काही दिवसात लातूर शहर आणि जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी नागरीकांकडून येत आहेत. सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या कठीण काळातून आपण जात आहोत. कोविड-19 बाधित झालेले अनेक रुग्ण शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही रुग्ण संस्थात्मक तथा गृहविलगीकरणात आहेत. या परिस्थितीत वारंवार वीज पुरवठा खंडीत झाल्यास रुग्णालयात उपचार घेणाऱ्या काही गंभीर अवस्थेतील रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महावितरणने अचानक वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.अपवादात्मक परिस्थितीत दुरुस्तीच्या कामासाठी काही भागात वीज पुरवठा खंडीत करावयाचा असल्यास त्या परिसरातील रुग्णालयांना यासंबंधीची पूर्वकल्पना द्यावी, त्यांची नाहरकत मिळाल्यावरच किंवा पर्यायी व्यवस्था झाल्यानंतरच तेथील वीज पुरवठा खंडीत करावा, असे निर्देशही पालकमंत्री श्री.देशमुख यांनी दिले.
No comments