web-ads-yml-728x90

Breaking News

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांची  प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्यातील सद्य:स्थितीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. राज्यातील कायदा-सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या सूचना त्यांनी  यावेळी संबंधितांना  दिल्या.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस विभाग सातत्याने कार्यरत आहे. या काळातील बंदोबस्ताचे नियोजन, पोलीस कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच पोलिसांच्या अडचणींची माहिती देखील श्री. वळसे पाटील यांनी यावेळी घेतली. या बैठकीला गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी उपस्थित होते. राज्यात कडक निर्बंध लावले आहेत त्याची चांगली अंमलबजावणी होईल हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा कोविडची संसर्ग साखळी तोडणे हा आहे हे लक्षात ठेवावे आणि कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तसेच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.  पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांना जनमानसात फिरावे लागते, यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याबाबतही दक्षता घ्यावी. संसर्ग झाल्यास तात्काळ उपचारासाठी रुग्णालय व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.  पोलीस दलातील प्रत्येकाचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे लसीकरण करुन घ्यावे. त्यासाठी आवश्यक त्या सोयी सवलती उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

No comments