१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना १ मे पासून मोफत लस; परंतु उपलब्धतेची मर्यादा, त्यामुळे नागरिकांनी लस केंद्रावर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार असून यासाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही शासनाची तयारी आहे परंतू लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लगेच उद्यापासून लस केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांनी राज्याची लसीकरणाची क्षमता रोज १० लाख एवढी असली तरी या वयोगटासाठी फक्त ३ लाख डोस राज्याला मिळाल्याची माहितीही दिली. मुख्यमंत्र्यांनी काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने वाढणारी रुग्णसंख्या थोपवण्यासाठी कडक निर्बंधाची आवश्यकता असल्याचे सांगतांना राज्यातील नागरिकांनी करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करून राज्य शासनास सहकार्य करण्याचे आवाहन ही केले. तसेच येऊ शकणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्यभरात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
No comments