जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात महानिर्मिती अधिकाऱ्यांची रात्री पाहणी
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर
नागपूर जिल्ह्यातील कोरोना उद्रेक नियंत्रित करण्यासाठी प्रसंगी महानिर्मितीच्या कोराडी व खापरखेडा विद्युत केंद्रातील ओझोन प्लांट मधून ऑक्सिजनची उपलब्धता करता येईल का व त्याबाजूलाच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी बेडची व्यवस्था करता येईल का याची तातडीने चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांना दिले आहेत. सोमवारी रात्री जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही केंद्राची पाहणी वरिष्ठ स्तरावर करण्यात आली. उद्या सकाळी यासंदर्भातील अहवाल सादर करणार आहे.नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक प्रचंड वाढला असून दररोज मृत्यू संख्येचा आकडा वाढत आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व खासगी व शासकीय हॉस्पिटल, तसेच कोविड केअर सेंटरमध्ये बेडची उपलब्धता, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबत वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत कोरोना लाट कायम राहिल्यास मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन व बेडची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी खापरखेडा व कोराडी येथील ओझोन प्लांट मधून ऑक्सिजनचा पुरवठा करता येणे शक्य आहे. मात्र प्रत्यक्ष कृती करताना ही बाब शक्य आहे का..? या संदर्भातील तांत्रिक व प्रशासकीय बाजू तपासण्यासाठी सोमवारी रात्री जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी स्वतः दोन्ही वीज केंद्रांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, उपमुख्य अभियंता शरद भगत, कोराडी येथील मुख्य अभियंता राजकुमार तासकर, अनिल आष्टीकर होते. उद्या सकाळी या शक्यते संदर्भात पालकमंत्र्यांमार्फत राज्य शासनाला अहवाल दिला जाणार आहे.
No comments