Breaking News

सामाजिक न्याय विभागांतर्गत ५ योजनांसाठी सव्वा चौदाशे कोटी रुपये निधी वितरित – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कोरोनाच्या अनुषंगाने कडक निर्बंधांच्या काळात गरीब जनतेला दिलासा मिळावा या हेतूने राज्य सरकारने यापूर्वीच विशेष पॅकेज घोषित केले आहे. यामधून सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांतील ३५ लाख लाभार्थ्यांना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे प्रतिमहिना एक हजार रुपये प्रमाणे दोन महिन्यांचे अर्थसहाय्य देण्यासाठी १ हजार ४२८ कोटी ५० लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हास्तरावर योजनेच्या लाभार्थीच्या संलग्न बँक खात्यांवर ही रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक नियमावली संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या ५ योजनांसाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबद्दल श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.

No comments