0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात, “रजनीकांत यांनी त्यांच्या शैलीदार अभिनयानं भारतीय चित्रपटसृष्टी कसदार, समृद्ध बनवली. चित्रपटाच्या पडद्यावर कल्पनेपलीकडचा ‘महानायक’ सादर केला. अभिनयाच्या बळावर ‘अशक्य ते शक्य’ करुन दाखवलं. चित्रपटांतच नव्हे तर, जनमनातही ते ‘महानायक’ ठरले. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचणाऱ्या स्वर्गीय दादासाहेब फाळके यांच्या नावाचा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर होणं आणि या दोघा चित्रकर्मींचं ‘मराठी’ असणं ही आनंदाची, अभिमानाची, गौरवाची बाब आहे. मी रजनीकांत यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या अभिनय व व्यक्तिमत्वाचं गारुड चित्रपट रसिकांच्या मनावर चिरंतन राहील, असा विश्वास व्यक्त करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a comment

 
Top