web-ads-yml-728x90

Breaking News

रुग्णांना मोफत रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – आमदार किसन कथोरे

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना  रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे  या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु झाला असून रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची लूट होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने आरोग्य विभागामार्फत सर्व कोविड रुग्णालयांना व रुग्णांना मोफत  रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आदींना सादर केलेल्या निवेदनाद्वारे आमदार किसन कथोरे यांनी  रेमडेसिवीरच्या सुरु असलेल्या काळ्या बाजाराकडे लक्ष वेधले आहे. राज्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रुग्णांना हे इंजेक्शन लिहून देतात. मात्र या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णांचे नातेवाईक मिळेल त्या किमंतीला घेत आहेत. सदर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याचे भासवून १२०० रुपयांचे इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांना २५ हजारापर्यंत काळ्या बाजारात घ्यावे लागत असल्याचे आमदार कथोरे यांनी या निवेदनात नमूद केले आहे. कोविड १९ च्या उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहे. मग कोविड रुग्णालयांना व पर्यायाने प्रत्येक रुग्णाला हे इंजेक्शन मोफत देण्यास काय अडचण आहे? असा सवाल कथोरे यांनी उपस्थित केला आहे. राज्य शासनाने आरोग्य विभागामार्फत  रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करून प्रत्येक कोविड रुग्णालयांना व रुग्णांना मोफत देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. तसेच आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ही इंजेक्शन्स खरेदी करण्यास परवानगी देऊन प्रत्येक स्थानिक आमदारांना त्यांच्या मतदार संघात मोफत इंजेक्शन्स देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी किसन कथोरे यांनी केली आहे. शासनाने याबाबत परवानगी दिल्यास आपण आपल्या स्थानिक विकास निधीतून रेमेडेसिवीर इंजेक्शन खरेदी करून मतदारसंघातील कोविड रुग्णालयांना व रुग्णांना मोफत देण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

No comments