Breaking News

वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगांव अभयारण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कन्हारगांव हे राज्यातील 50 वे अभयारण्य ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाच्या गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत कन्हारगांव अभयारण्य घोषित करण्यास मान्यता देण्यात आली होती.व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित होण्यासाठी आणि वनसंपदेचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निमित्ताने म्हटले आहे. विदर्भ ही देशाची व्याघ्र राजधानी मानली जाते. वाघांचे सुरक्षित स्थलांतर होणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे याला शासनाने नेहमीच प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले. याच भूमिकेतून कोल्हापूर ते कर्नाटक पर्यंतचा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी पश्चिम घाटात 8 तर विदर्भात 2 अशा 10 संवर्धन राखीव क्षेत्राची घोषणाही शासनाने  याच बैठकीत केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

No comments