प्रकल्पग्रस्तांचे BPCL गेटसमोर बेमुदत धरणे उपोषण
BY - युवा महाराष्ट्र लाइव – उरण
भेंडखळ गावातील उर्वरित BPCL प्रकल्पग्रस्तांना त्वरीत नोकरीत सामावून घ्यावे. नोकरी मिळे पर्यंत प्रकल्पग्रस्तांना 20, 000 रुपये निर्वाह भत्ता चालू करणे, अपंग व्यक्तींच्या वारसांना त्वरीत नोकरीत सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती भेंडखळ तर्फे BPCL भेंडखळ कंपनी गेट समोर दि 15/3/2021 पासून बेमुदत धरणे उपोषणाला सुरवात झाली असून आज दि 21/3/2021 रोजी उपोषणाचा 7 वा दिवस आहे तरी अजूनही बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही.दि 22/3/2021 रोजी BPCL प्रशासनाच्या मुख्य कार्यालय खारघर -नवी मुंबई येथे या महत्वाच्या समस्यावर मार्ग काढण्यासाठी एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले असून यातून सकारात्मक मार्ग निघेल अशी आशा BPCL प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL )ही केंद्र सरकार पुरस्कृत कंपनी कार्यरत असून BPCL ने या प्रकल्पासाठी भेंडखळ गावातील 207 एकर जमीन संपादित केली. त्याबदल्यात प्रकल्पग्रस्तांना नोकरीं व इतर आश्वासने देण्यात आली. मात्र BPCL प्रशासनाने ते आश्वासन पूर्ण केले नाही. आता तर मात्र या कंपनीत परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा खूप मोठा भरणा आहे.स्थानिकांना मात्र नोकर भरती पासून वगळले जाते. बेरोजगार प्रकल्पग्रस्तांनी कंपनी प्रशासनाशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला पण BPCL कंपनी प्रशासनाकडून कोणतेही योग्य असा प्रतिसाद मिळाला नाही. भेंडखळ गावातील बेरोजगार प्रकल्पग्रस्त तरुणांना या कंपनीने कामावर रुजू करून घेण्यास विरोध दर्शविल्याने या कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती भेंडखळचे अध्यक्ष अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली BPCL गेटसमोर फिजिकल, सोशल डिस्टन्स पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून बेमुदत उपोषणाला दि 15/3/2021 रोजी सुरवात झाली असून या उपोषणाचा आज दि 21/3/2021 रोजी सातवा दिवस आहे.
No comments