web-ads-yml-728x90

Breaking News

सामाजिक समतेसाठी झटणे आव्हानात्मक - माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी मुंबई

देशाच्या उन्नतीकरिता झिजताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, हे लक्षात घेवूनच केंद्रात आणि राज्यात कार्यरत असताना समतेचा अर्थसंकल्प ही संकल्पना राबविली असे स्पष्ट करत सामाजिक समता जपत देशाला ऊर्जितावस्था देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा मनापासून अभिमान वाटतो कारण ते आव्हानात्मक कार्य करून देश घडवण्यासाठी झटत आहेत असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.सामाजिक कार्यकर्ते, संपादक कांतीलाल कडू यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना मानिनी आणि प्रोजेक्ट 100 संस्थांनी शिंदे यांच्या शुभ हस्ते नवी मुंबईतील हॉटेल योगी मिडटाऊनच्या सभागृहात 'ग्लोबल चेंजमेकर' पुरस्कार देवून गौरविले. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर शिंदे यांच्या समवेत पद्मश्री डॉ. विजय शहा, पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे, आयएफएसचे अधिकारी रघुनाथ नायकडे, डॉ. भारती चव्हाण, सुरज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

18-20 वर्षापूर्वी केलेल्या कार्याची आठवण आजही लोकं काढतात हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे, असे म्हणत समाज चांगल्या कार्याची दखल घेतोच असे शिंदे म्हणाले.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सामाजिक दुर्बल घटक, कैकाडी, पारधी समाजाला गुन्हेगारी मुक्तीसाठी काही योजना राबविल्या आहेत. त्यामुळे त्या समाजातूनही आज तरुण-तरुणी डॉक्टर, वकील झाल्या आहेत ही समाजाची उन्नती मानावी लागेल, असे ते म्हणाले.समाजात असलेली उडती पाखरे असतील त्यांना निवारा देणे, त्यांच्यासाठी कार्य करणे ही समाजाची आजची गरज आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मँथु यांच्या नावाने दिला जाणारा ग्लोबल चेंजमेकर पुरस्कार दिला जात आहे ही आनंदाची, अभिमानाची बाब आहे. नेपाळपासून देशातील विविध राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जातो यातून देशाची उन्नती साधण्याचा आयोजक डॉ. भारती चव्हाण, सुरज गायकवाड यांचे प्रयत्न महत्वपूर्ण असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.

निस्वार्थ बुद्धीने समाजात अहोरात्र कार्य कारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे भारत देश नक्कीच सुजलाम सुफलाम होईल असे सांगत ज्यांच्याकडे आत्मविश्वास आहे, तेच समाजाच्या प्रगतीसाठी यशस्वीतेने झिजत राहतात तर ज्यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो ते काहीच करू शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.पर्यावरणावर देशात गेली तीन दशके अतिशय उत्तमरित्या काम सुरू आहे. त्याचे यशही आपल्याला दिसत आहे. तेव्हा पर्यावरण आणि सामाजिक समता जपली गेली तर नक्कीच देशाला अधिक ऊर्जितावस्था लाभेल असेही शिंदे यांनी सांगितले.पद्मश्री डॉ. विजय शहा, पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे, आयएफएसचे अधिकारी रघुनाथ नायकडे आदींनी उत्तम अनुभव विशद करून कार्यक्रमाला चार चाँद लावले.मानिनीच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.

No comments