web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्राच्या विविध प्रयत्नांमुळे कोरोना प्रतिबंधात यश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाराष्ट्राने कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि  पारदर्शकपणे पावले उचलली आणि त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यूदर महाराष्ट्रात कमी आहे असे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. २ फेब्रुवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार दर दश लक्ष लोकसंख्येत दिल्लीत ३७ हजार ८४४, गोव्यात ३६ हजार ७३२, पौंडेचरीत ३१ हजार ३५०, केरळमध्ये २८ हजार ८९, चंडीगडमध्ये १९ हजार ८७७ इतके पॉझिटिव्ह  रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी १६ हजार ८ रुग्ण होते. महाराष्ट्राचा  क्रमांक यामध्ये देशात ६ वा होता. महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. महाराष्ट्राच्या या प्रामाणिकतेचे आणि करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक आंतरराष्ट्रीय संस्थांनीदेखील  केले आहे. अगदी यासंदर्भातील माहिती अद्ययावत करताना पूर्वीचे जे मृत्यू कोरोनामुळे झाले होते पण त्याची नोंद झाली नव्हती अशा सुमारे हजारभर मृत्यूची नोंद पारदर्शकपणे करण्यात आली. इतर काही राज्यांनी तर कोरोनाने मृत्यू झालेल्या पण रक्तदाब, मधुमेह अशा सहव्याधी असलेले मृत्य हे कोरोना मृत्यू म्हणून नोंद केलेले नव्हते इतकेच नाही तर केवळ कोरोना आहे पण श्वसनाशी संबंधित लक्षणे नाहीत असे कोरोनाचे मृत्यू गृहित धरले नव्हते. एकूण मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दशलक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आकडेवारीनुसार  दिल्लीत ६४७, गोव्यामध्ये ५२७, पौंडेचरीत ५२२, आणि महाराष्ट्रात ४०३ मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही.

No comments