0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कोविडचे लसीकरण वेगाने सुरु आहे परंतु ब्रिटन, ब्राझिलमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत ते पाहता आपण बेसावध न राहता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणाच्यावेळी सांगितले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, समूह प्रतिकारशक्तीमुळे (हर्ड इम्युनिटीमुळे) आपल्याकडे लक्षणीयरित्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असे जर आपण मानत असू तर अशाच प्रकारे समूह प्रतिकारशक्तीनंतर देखील युरोपमध्ये संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते हे लक्षात घ्यावे.

सध्या चीनमधून पसरलेल्या मूळ विषाणूव्यतिरिक्त ब्राझिलियन, आफ्रिकन, युके असे या विषाणूचे तीन आणखी स्ट्रेन असून आपल्याकडे ते पसरू नयेत म्हणून अधिक दक्षता घ्यावी लागेल व जागरूकता बाळगावी लागेल.दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण लसीकरण सुरु असले तरी आरोग्याचे नियम पाळत राहिले पाहिजे. कारण केंद्राने जरी चित्रपटगृहे व इतर काही बाबतीत निर्बंध बऱ्यापैकी शिथील केले असले आणि महाराष्ट्रातदेखील आपण आता बऱ्यापैकी व्यवहार सुरु केले असले तरी आपण महाराष्ट्रात सरसकट सगळे निर्बंध उठविणार नसून काळजीपूर्वक पुढे जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

Post a comment

 
Top