0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान ही सेवाभावी संस्था नेहमीच आपल्या सामाजिक उपक्रमात अग्रेसर अशी सामाजिक सेवा संस्था आहे. कोरोना काळात या संस्थेने केलेल्या कार्याला तोड नाही. गरीब गरजूना धान्य वाटप, विद्यार्थ्याना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशाना वैद्यकीय मदत अशा विविधरूपी अंगांनी मदत कार्य हे निरंतर आणि अविरतपणे चालूच असते.  आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोलवा बंदर, शिवडी येथील गरीब वस्तीत अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान आणि मयुरेश ड्रेसवाला यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक पोशाखाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी मयुरेश शेरला (मयुरेश ड्रेसवाले) यांचा सत्कार देखिल करण्यात आला. मुलांना पारंपारिक पोशाखाचे वितरण करण्यामागील उद्दिष्ट इतकेच की आपली महाराष्ट्र भूमी ही थोर संतांची, थोर महात्म्यांची, देशासाठी बलिदान देणाऱ्या देशभक्तांची तेव्हा मुलांना आपल्या देशासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव व्हावी या हेतुपुरस्सर पारंपारिक पोशाखाचे वितरण करण्यात आले. यावेळी जवळजवळ २०० ते २५० गरीब मुलांना पोशाखाचे वितरण करण्यात आले याप्रसंगी अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व युनिवर्सल ह्यूमन राईट मुंबई महासचिव अमोल वंजारे, सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार महेश्वर तेटांबे, मयुरेश ड्रेसवाले चे मालक चालक मयुरेश शेरला, सामाजिक कार्यकर्ते शेखर अडके तसेच स्थानिक रहिवाशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अक्षरा सामजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल वंजारे यांनी उपस्थित पाहुण्यांचे आणि स्थानिक रहिवाश्याचे आभार मानले. अशाप्रकारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पोशाख वितरणाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झाला.

Post a Comment

 
Top