0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - औरंगाबाद

नगर विकास विभागातील योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र या योजना प्राधान्यक्रमाने राबवून वेळेत पूर्ण कराव्यात. कामात हयगय सहन केली जाणार नाही, अशी तंबीच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिली. मंत्री शिंदे यांनी आज महानगरपालिकेत विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, मुख्य अभियंता सखाराम पानझडे आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास महानगरपालिकेत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पाणी पुरवठा योजना, सफारी पार्क, बाळासाहेब ठाकरे उद्यान यासह नगर विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान घरकुल योजना, रमाई आवास योजना यांच्यासह इतर योजनांचा आढावा घेतला. वैयक्तिक लाभाच्या योजनामध्ये दिरंगाई होत असल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळण्यासाठी तातडीने कारवाई केली पाहिजे. या कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. शहरातील रस्त्यांच्या कामाबाबतही शिंदे यांनी माहिती घेतली. सर्व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Post a Comment

 
Top