web-ads-yml-728x90

Breaking News

ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

ट्रान्सहार्बर लिंक (मुंबई पारबंदर प्रकल्प) प्रकल्पांच्या कामांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए.राजीव आदी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे प्रकल्पाच्या सद्यस्थितीच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले.मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील प्रदेशाचा विकास करण्याच्या दृष्टीने मुंबई पारबंदर प्रकल्पाचा प्रस्ताव सुमारे ३० वर्षापूर्वीपासून विचाराधीन होता. मुंबई व नवी मुंबई यामधील वाहतूक वेगवान व्हावी या हेतूने मुंबई बेटावरील शिवडी ते मुख्य भूमी (नवी मुंबई) वरील न्हावा या दरम्यान पूल बांधण्याचा विचार करण्यात आला होता. शासनाने दि. ४ फेब्रुवारी २००९ च्या शासन निर्णयान्वये या प्रकल्पाची मालकी व अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे असेल असे आदेशित केले. त्याचप्रमाणे या प्रकल्पाकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे निधी उपलब्ध करण्यात येईल, असेही आदेशित करण्यात आले. मुंबई पारबंदर प्रकल्प हा यापूर्वी रस्ते वाहतूक प्रकल्प म्हणून नियोजित होता. महाराष्ट्र शासनाने दि. ८ जून २०११ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे मुंबई पारबंदर प्रकल्पास प्रादेशिक विकास प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे.

 

No comments