0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची (डीम्ड कन्व्हेअन्स) मोहीम १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. ज्या संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण राहिले आहे अशा गृहनिर्माण संस्थांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

मंत्रालयात श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मानीव अभिहस्तांतरण मोहिमेसंदर्भात आढावा बैठक झाली.  सहकारमंत्री श्री.पाटील म्हणाले, मानीव अभिहस्तांतरण हा सर्व गृहनिर्माण संस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ही मोहीम सकारात्मक दृष्ट्या आणि परिणामकारकरित्या राबविली जात आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सहज करण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्थांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. मानीव अभिहस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेत गृहनिर्माण संस्थांना महसूल, नोंदणी महानिरीक्षक व इतर कार्यालयाकडून कागदपत्रे मिळण्यास विविध अडचणींचा सामना करावा लागतो अशावेळी या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी सहकार, महसूल आणि नोंदणी महानिरीक्षक यांची संयुक्त बैठक महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्याचे निर्देशही श्री.पाटील यांनी यावेळी दिले.सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला म्हणाल्या, गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सहज आणि सुलभ करण्यासाठी ऑफलाईनसह ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करताना गृहनिर्माण संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाल्यास मोहिमेवर निरीक्षण करण्यात सहजता येईल आणि गृहनिर्माण संस्थांनाही अर्ज करण्यात अडचणी येणार नाही.

Post a Comment

 
Top