BY - युवा महाराष्ट्र लाइव – भंडारा
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे आग लागून १० नवजात शिशुंचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या संदर्भाने राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सायंकाळी तातडीने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. रुग्णालयातील यंत्रणेशी चर्चा करून घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. या भेटीत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते तसेच ड्युटीवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. घटनास्थळी तातडीने पोहोचून उपाययोजना करणाऱ्या अग्निशमन दलाच्या तसेच सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचे श्री. देशमुख यांनी कौतुक केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासन मृतकांच्या पालकांच्या पाठीशी आहे. घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखाची मदत देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल प्राप्त होताच घटनेचे नेमके कारण कळणार आहे. यावेळी त्यांनी आरोग्य उपसंचालकांसोबत चर्चा करुन तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर श्री. देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन या संदर्भाने सविस्तर चर्चा केली. यावेळी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम तसेच आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी व राजा तिडके आदी मान्यवर सोबत होते.
Post a comment