0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याला अनुसरून पोलीस बांधव आपले कर्तव्य करत असतात. त्यातून जेव्हा एखादे मानवतावादी कामगिरी त्यांच्या हातून घडते त्यावेळेस पोलिसांचा, त्यांच्या कामगिरीचा मला प्रचंड अभिमान वाटतो, असे भावोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज काढले.रेल्वे पोलिस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सुजीतकुमार निकम यांनी स्वतःचे प्राण धोक्यात टाकून दहिसर रेल्वे स्थानकावर एका ६० वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले. त्याबद्दल त्यांचा सत्कार आज ज्ञानेश्वरी बंगला येथे करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

दहिसरची घटना

१ जानेवारी रोजी गणपत सोलंकी हे साठ वर्षाचे गृहस्थ दहिसर येथून खारला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे होते. त्यावेळी दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून स्लो लोकल जाणार होती, ती पकडण्यासाठी फ्लाय ओव्हर ब्रिजचा वापर न करता रुळावर उडी मारून धावत दुसऱ्या बाजूस असलेली लोकल पकडण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार त्यांनी रूळावर उडी मारली. परंतु विरुद्ध दिशेने येणारी फास्ट लोकल पाहता ते गांगरून गेले त्यांना परत फलाटावर चढता येत नव्हते. हे दृश्य तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई सुजीत कुमार यांनी पाहिले. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गणपत सोलंकी यांना फलाटावर ओढून घेतले. व त्यांचा जीव वाचविला. त्यानंतर त्यांच्या मुलाला बोलून त्यांना त्यांच्याकडे सुपूर्द केले. या कामगिरीबद्दल निकम यांचा सत्कार आज गृहमंत्र्यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी रेल्वे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार उपस्थित होते.

Post a comment

 
Top